केडगाव / संदीप टूले : खानवटे (ता.दौंड) येथील गेली 15 ते 20 दिवस झाले तरीही ग्रामपंचायतीचा आरो प्लँट बंद आहे. त्यामुळे गावातील लोकांना इतर ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी जावे लागत आहे. मग ग्रामपंचायत नेमकी काय आणि कोणासाठी काम करत आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
2014 मध्ये अंदाजे 13 लाख रुपये किंमतीचा आरो प्लँट पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या सहकार्याने बबनराव धायतोंडे सरपंच असताना हा खानवटे गावचा आरो प्लँट चालू झाला होता. परंतु, आज याच आरो प्लँटची अवस्था आणि किंमत पाहिली तर ती 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत येऊन ठेपली आहे. याच प्लँटवर लाखो रुपये खर्च झालेला आहे.
खानवटे गावच्या तिन्ही बाजूला भीमानदीचे पात्र असून, मोठा दुष्काळ पडला तरी गावाच्या एकाबाजूला पिण्याच्या पाण्याचा साठा मुबलक राहतो. तरीही गाव नेहमी तहानलेलाच का? यासाठी ग्रामविकास अधिकारी संतोष कांबळे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘ग्रामपंचायतीचे सदस्य मनमानी कारभार करतात. परस्पर खर्च करून मला बिगर मूल्यांकन, एस्टीमेटची जास्तीची बिले काढायला लावतात. ती जास्तीची बिले काढत नाही म्हणून मला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात.
गेल्या 2 महिन्यांपूर्वी मला खानवटे गावच्या माजी सरपंचाने मारहाण केली होती. तरीही मी गावात सर्वांना विचारात घेऊन काम करत आहे. परंतु, मला याठिकाणी नाहक त्रास दिला जात आहे. हे काम लांबले आहे. कारण ग्रामपंचायतीचा कर वसूली फारच कमी आहे. त्यामुळे गेल्या 15 ते 20 दिवसांपासून आरो प्लँट बंद आहे. सध्या दुरुस्तीचे काम चालू आहे. लवकरच पाणी चालू होईल’.
स्वतः खर्च करून इलेक्ट्रिक मोटर केली दुरुस्त
उपसरपंच अर्जुन गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘ग्रामविकास अधिकारी आणि एका सदस्याचा वाद झाला हे खरं आहे. परंतु, याचा गावातील लोकांना नाहक त्रास होत आहे. मात्र, मी स्वतः खर्च करून पुणे येथून इलेक्ट्रिक मोटर दुरुस्त करून आणली आहे. उद्यापासून शुद्ध पाणी पुरवठा चालू होईल’. सरपंच अंजली ढवळे म्हणाल्या की, ‘लवकरच आरोचे पाणी सुरु होईल’.
सर्व ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले पाहिजे
तंटामुक्ती अध्यक्ष दिपक ढवळे म्हणाले, ‘गावातील सर्व ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. आरो प्लँट बंद आहे. यास ग्रामपंचायत सदस्यांचा नाकर्तेपणा आणि सरपंच, उपसरपंच आणि सदस्य जबाबदार आहेत’.