गणेश सुळ / केडगाव : दौंड विधानसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक डॉ. ए. व्यंकदेश बाबू यांच्या उपस्थितीत आणि निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांची पहिली दैनंदिन खर्च तपासणी करण्यात आली. श्री. बाबू यांच्याकडून उमेदवारांच्या ८ नोव्हेंबर अखेरच्या खर्चाच्या हिशोबाच्या नोंदवह्याची प्रथम खर्च तपासणी पार पडली. यावेळी त्यांनी खर्च विषयक मार्गदर्शन करुन सूचना दिल्या.
यावेळी १४ उमेदवारापैकी १३ उमेदवारांची खर्च तपासणी करण्यात आली. रमेश थोरात यांना खर्च तपासणीच्यावेळी अनुपस्थित राहिल्याबद्दल खर्च निरीक्षक यांच्या डॉ. बाबू यांच्या सुचनेनुसार नोटीस बजावण्यात आली आहे. उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची दुसरी तपासणी १४ नोव्हेंबर रोजी व तिसरी तपासणी १८ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मरकड यांनी दिली आहे.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय विजय कावळे, सहायक खर्च निरीक्षक विकास मीना, मुकेश ठाकूर, समन्वय अधिकारी (खर्च व्यवस्थापन कक्ष) तेजस्विनी बोकेफोड, एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी, व्हीव्हीटी पथकाचे नोडल अधिकारी राहुल माने आदी उपस्थित होते.