पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आज शहाळे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली. या महोत्सवावेळी गणेश भक्तांनी उपस्थित राहून या सोहळ्याच्या आनंद घेतला.
वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो.
आज पहाटे तीन वाजता ब्रम्हणस्पती सुक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे चार वाजता प्रख्यात गायक डॉ. अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी आणि छोटे उस्ताद फेम श्रेया मयुराज यांचा स्वराभिषेक कार्यक्रम सादर केला.