पुणे : दगडूशेठ गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक यंदाही दुपारी चार वाजता काढण्यात येणार आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि विसर्जनाच्या दिवसाचे पावित्र्य राखण्यासाठी ट्रस्टने वेळेत विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली.
गतवर्षी दगडूशेठ गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला दुपारी चार वाजता सुरुवात झाली. तर, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मूर्तीचे विसर्जन झाले. यंदाही त्याच पद्धतीने मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा ट्रस्टकडून हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेश चतुर्थीला म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी हुमनाबाद, कर्नाटक येथील श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते ‘श्रीं’ ची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सायंकाळी सात वाजता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे.
शनिवारी (दि. ७) प्राणप्रतिष्ठेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून सिंह रथातून ‘श्रीं’ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ साकारण्यात आला असून, दोन सिंहांच्या प्रतिकृती रथावर लावण्यात येणार आहेत. यंदा साकारण्यात आलेल्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येत असून, त्यावर रंगकाम करण्यात आले आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून, भाविकांना लांबून सहजतेने ‘श्रीं’चे दर्शन घेता येणार आहे.