पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी डॉक्टर महिलेची ४५ लाख ६० हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित डॉक्टर महिलेने फिर्याद नोंदवली आहे. फिर्यादी या पर्वती परिसरात वास्तव्याला आहेत. सायबर चोरट्यांनी मार्च महिन्यात त्यांच्या मोबाइलवर संदेश पाठवला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून भामट्यांनी त्यांना गुंतवणूक योजनेची माहिती दिली. तसेच, त्यासाठी त्यांना एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.
डॉक्टर महिलेने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने गेल्या तीन महिन्यांत वेळोवेळी ४५ लाख ६० हजार रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांना पैसे दिले नाही. परताव्याबाबत विचारणा करणाऱ्या डॉक्टर महिलेने चोरट्यांच्या क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.