पिंपरी (पुणे) : एमएनजीएल कंपनीतून बोलत असल्याचे सांगत फोनवरील अनोळखी व्यक्तीने वृद्ध व्यक्तीला गॅसचे पेमेंट करण्याच्या बहाण्याने गोपनीय माहिती घेत २ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी ६८ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार एका मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादींना फोन करून तो एमएनजीएल कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. गॅस बिलाचे पेमेंट कसे करता, असे विचारत गॅस बिलाचे पेमेंट करण्यासाठी एमएनजीएल कंपनीच्या एप्लीकेशनचा वापर करण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांचा एटीएम कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, बँक अकाउंट नंबर विचारला. फिर्यादी यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून ती ओपन करण्यास सांगत त्यावर माहिती भरण्यास भाग पाडले. तुमचे अकाउंट अपडेट झाले असून अपडेशन फी १२ रुपये डेबिट कार्डने भरा, असे सांगत एक एपीके फाईल पाठवून त्यावरून डेबिट कार्डची माहिती आरोपीने चोरली. त्यानंतर फिर्यादीस बोलण्यात गुंतवून त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ९४ हजार ५०० रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.