पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भिगवणमध्ये मंगळवारी (ता. १२) भुईमुगाच्या शेतात अफूची लागवड कल्याचे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर आता सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत बेकायदा अफूची लागवड केल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. पोलिसांच्या पथकाने छापा टाकून १४ किलो अफूची बोंडे जप्त केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तानाजी शांताराम हगवणे (वय ४८), शिवाजी बबन हगवणे (वय ५५, दोघे रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. किरकटवाडीतील नांदोशी रस्त्यावर इंद्रप्रस्थ सोसायटीजवळ आरोपी हगवणे यांची शेती आहे. शेतात बेकायदा अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि हवेली पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. हगवणे यांनी शेतात अफूची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने १४ किलो अफूची बोंडे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या अफूच्या बोडांची किंमत २८ हजार ७०० रुपये आहे.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक राहुल वांगडे, विकास अडागळे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, दत्ता तांबे, दगडू वीरकर, दिलीप आंबेकर, अशोक तारु यांनी ही कारवाई केली.