उरुळी कांचन, (पुणे) : तरडे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वरचे तरडे परिसरातून दररोज शेकडो डंपर मुरूम अवैध उत्खनन करून चोरून नेला जात आहे. दिवसाढवळ्या प्रशासनाच्या समक्ष राजरोसपणे सदर प्रकार सुरू आहे. याकडे प्रशासन काणाडोळा करीत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नियमबाह्य बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या महसूल कर्मचारी, अधिकारी व पोलिस पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी वारंवार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुरुमाचे अवैध उत्खनन व वाहतुकीचा धंदा तेजीत आहेत. पोटखराब जमिनीवरील मुरूम मातीमोल घेऊन अव्वाच्या सव्वा भावात विकला जात असल्याने गौणखनिज माफियांना गोरख धंदा सापडला आहे.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, सोरतापवाडी, उरुळी कांचन परिसरात दररोज तरडे – सोरतापवाडी या रस्त्यावरून आजतागायत करोडो रुपयांचा अवैध मुरूम उत्खनन करून वापरण्यात आलेला आहे. तरडयाचे तलाठी, विभागाचे मंडल अधिकारी, तालुका दंडाधिकारी तसेच महसूल व पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेकायदा मुरूम उत्खनन सुरू आहे. उत्खनन करणाऱ्यांवर राजकीय दबावापोटी व आर्थिक तडजोडीमुळे कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही यावेळी नागरिकांकडून केला जात आहे.
परिसरात धुळीचे साम्राज्य..
तरडे – सोरतापवाडी या रस्त्यावर वाहनांची रहदारी असते. याशिवाय, इतर वाहतूकही या रस्त्यावरून होत आहे. मुरुमाची गाडी रस्त्यावरून गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्याचा नाहक त्रास वाहनचालक, रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांना तसेच शाळेतील लहान मुलांना सहन करावा लागत आहे. या धुळीमुळे श्वसनाचे आजार, खोकला, दमा, घसा व डोळ्याचे विकार होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शेती पिकाचे नुकसान..
या धुळीमुळे शेतीपिकातील सर्वच पिकाचे भंयकर नुकसान झाले आहे. या रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली सर्वच पिकांवर धूळ जमा होत असल्याने पिकांची वाढ होत नसून ते जागेवरच जळून जात आहेत. तसेच बाजारात विकायला नेल्यास कोणी शेतमाल घ्यायला तयार होत नाही. शेतपिकाचे अतोनात नुकासान शेतकऱ्याला भोगावे लागत आहे. दिवसभर शेतात काम करताना उडणाऱ्या धुळीने साधा कामगारही शेतात काम करण्यासाठी तयार होत नाहीत.
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप म्हणाले, “मुरूम चोरी करणाऱ्या गाड्या शासनाला कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरत नाहीत. उरुळी कांचन, आळंदी म्हातोबाची, वळती या भागात सर्व मुरूम उपसा बंद आहे. तरड्यातच दिवसरात्र मुरूम उपसा सुरु आहे. निवेदन दिले असता दुसऱ्या दिवशी तुटपुंजी कारवाई केली जाते. महसूल विभागातील काही कर्मचारी कारवाई होण्याच्या अगोदरच मुरूम माफियांना सांगत असल्याने मुरूम माफिया व महसूल विभाग यांची मिलीभगत असल्याचा आरोप देखील जगताप यांनी केला आहे.”