राहुलकुमार अवचट
यवत : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली महापौर्णिमेनिमित्त होणारी यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी मातेची यात्रा दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावमुळे रद्द करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यात्रा साजरी होत असताना असताना दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
पहाटे देवाचे अभिषेक, पाणी घालणे, पोशाख, देवाच्या काठ्या व पालखीचा यांसारखे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. दरवर्षी होणारे ढोललेझीम पथक, यांसह प्रथमच डीजेचा देखील वापर करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी देखील करण्यात आली.
यात्रेमध्ये विविध वस्तूंचे स्टॉल व विविध पाळण्यात बसण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पाळण्याच्या परिसरात अनेक ठिकाणी माती व धूळ उधळत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
रात्री कलाभूषण रघुवीर खेडकर सहकांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर करण्यात आला. आज सोमवारी सायंकाळी ४ वाजता कुस्तीचा आखाडा रंगणार असून अनेक नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. कुस्ती आखाड्यानंतर यात्रेची सांगता होईल.