पुणे : राज्यातील शासकीय आश्रमशाळेत मोठा दूध घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर केला आहे. एका निनावी व्यक्तीने आपल्याला एकूण ११ फाईल पाठवल्या असून सत्ताधारी पक्षाचाच हा माणूस असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे शासकीय दस्तावेज सादर केले आहेत तसेच राज्य सरकारने दूध खरेदीत ८० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
रोहित पवार म्हणाले, मला एका अज्ञात व्यक्तीने ११ निनावी फाईल्स पाठवल्या आहेत. ही व्यक्ती कदाचित राज्य सरकारमधील असावी. या ११ फाईल्सपैकी दोन सर्वात लहान घोटाळ्यांच्या फाईल्स मी तपासून प्रसारमाध्यमांसमोर सादर करत आहे. या फाईलमध्ये शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुधाच्या खरेदीत राज्य सरकारने केलेल्या घोटाळ्याचे पुरावे आहेत.
यामधील पहिली फाईल शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील दुध पुरवठ्याची आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना २०० मिली दूध पुरवले जात आहे. या दूध पुरवठ्यासाठीचा पहिला करार २०१९ मध्ये झाला. या करारात ४६.४९ रुपये दर होता. चितळे, महानंद, अमूल दूधाचे दर ४९.७५ रुपये होते. त्या दराने दुध पुरवठा होत होता.
मात्र २०२३-२४ मध्ये मात्र हा दर १४६ रुपये झाला आहे. १६४ कोटी रुपयांचे हे टेंडर असून एवढ्या महागड्या दराने दूध खरेदी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी केला जात आहे. यामध्ये ८० कोटी रुपयांचं कमिशन दिलं गेलं आहे, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, शेतकऱ्याकडून ३० रुपये दराने घेतलेले दूध गरीबांच्या मुलांना १४६ रुपये दराने दिले जात आहे. या विरोधात पीएमओ, सीएमओ, ॲन्टीकरप्शनकडे तक्रार देणार आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील खाजगी दूध डेअरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याच्या दूध संघाला हे काम दिले आहे, असं देखील रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.