युनूस तांबोळी
शिरूर : सत्तेत राहून जनतेचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने प्रयत्न केला आहे. गेली ३२ वर्षे या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असून, समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करत आहोत. बोलघेवड्या लोकांकडे लक्ष देऊ नका. जनतेची नाळ जोडलेल्या रोखठोक लोकप्रतिनिधींमार्फत विकासाची वज्रमुठ हाती घेऊन शेतकऱ्याच्या पिकाला दर आणि महिलांना रोजगार मिळणार आहे. विरोधाला विरोध करून सत्तेपासून दूर राहून विकास होणार नाही. जगातल्या अर्थव्यवस्थेबाबत महाराष्ट्राला देशात नंबर वन राज्य बनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, विलास लांडे, विष्णूकाका हिंगे, मानसिंग पाचुंदकर, विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पवार म्हणाले की, राज्याचा ६ लाख कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर करत असताना समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचे काम केले. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विकासाची वज्रमूठ बांधण्याचे काम केले आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यात ६५३ कामे तर १,१५७ कोटी रूपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. ‘हर घर सौर’ या उपक्रमातून ३०० युनीटपर्यंत मोफत वीज देणार आहोत. एक रूपयात पिक कर्ज, विजेसाठी सौर तर वन्यप्राण्यांपासून सरंक्षण देण्याचे काम करण्यात येईल. अल्पसंख्याक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत आहोत. पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शरद पवार साहेबांनी आम्हाला संधी दिली हे खरे असून, त्या संधीचे सोने केल्याने चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासाची कामे करून दाखवली. दुधाच्या सबसिडीबाबत देखील सरकार विचाराधीन आहे. यापुढील वेळ आपली आहे. एवढी ग्वाही देतो, असेही पवार यांनी सांगितले.
वळसे पाटील म्हणाले की, डिंभा धरणातून ओसंडून वाहणारे, नदीत जाणारे अतिरिक्त पाणी बोगद्याद्वारे खाली न्यायला काहीच हरकत नाही. नंतर त्यात बदल होऊन काही लोकांनी वेगळा अर्थ काढला आहे. घोडनदीवरील ६५ व वेळ नदीवरील १८ बंधाऱ्यांना पाणी सोडू नका. फक्त कालव्याद्वारे पाणी द्या, असा निर्णय झाला. अजितदादांनी तो निर्णय थांबवून या बंधाऱ्याना दोन-तीन वेळा पाणी सोडून भरून द्यायची अशी भूमिका घेतली. भविष्यात पाण्यावरून संघर्ष होईल हे मी सांगितले होते. उर्जा मंत्री असताना राज्य भारमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षणमंत्री असताना जे निर्णय घेतले त्यामुळे आज आपल्या मुली उच्च शिक्षण घेऊ लागल्या आहेत. अर्थमंत्री असताना राज्यात ७२ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी, नंतर उर्वरीत ६७२८ कोटी रूपयांचे कर्जवाटप केले होते. साहेबांचे माझ्यावर प्रेम होते. आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. पक्षाच्या बैठकीत बसून विचार करून काही भूमिकांच्या संदर्भात निर्णय घेतला असून, हा एकट्या दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय नाही. आंबेगाव तालुक्याचे झालेले परिवर्तन बिघडणार नाही, याची काळजी घ्या. जे करीन समाजाच्या हितासाठी करणार.
इच्छुकांचे शक्तीप्रदर्शन…
जिल्हा परिषद निवडणुका कधी होतील हे सांगता येणार नाही. पण मंचर येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेच्या प्रचारार्थ आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील माजी अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
टीका तर होणारच…
(कै.) माजी आमदार दत्तात्रेय वळसे पाटील यांना ‘भिमाशंकर’चे अध्यक्ष व्हायचे होते, पण शक्य झाले नाही. यावर वळसे पाटील भावनावश झाले. गेल्या १५ वर्षांत माजी खासदार आढळराव पाटील यांनी विरोधात निवडणुका लढवल्या. एका निवडणुकीत त्यांच्या पत्नीला माझ्या विरोधात निवडणुकीत उभे केले. पण आश्चर्याची बाब म्हणजे या दरम्यान त्यांनी कोणतीही वैयक्तिक टीका माझ्यावर केली नाही, असे वळसे पाटील यांनी सांगितले. विष्णू हिंगे पाटील यांनी ‘दाखव रे तो व्हिडिओ…’ म्हणत व्हिडीओच्या माध्यमातून टीका करत देवदत्त निकम काय म्हणाले हे दाखविण्यात आले.