पुणे : विशीतील तरुणांचा गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सर्वाधिक भरणा असल्याचे पुणे पोलिसांच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ३२ गुन्हेगारी टोळ्यांची नोंद आहे. त्यामधल्या पाच टोळ्या निष्क्रिय आहेत. १३ टोळ्या विशीतील तरुणांकडून चालविल्या जात असून, त्यांना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान ठाकले आहे.
शहर पोलिसांनी गेल्या वर्षात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईत सुमारे ७० अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून आला. अडीचशेहून अधिक अल्पवयीन मुलांवर विविध गंभीर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर आता १३ गुन्हेगारी टोळ्या विशीतील मुलांकडून चालविण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
जुन्या टोळ्या सक्रिय
शहरात सन २०१०पर्यंत पोलिसांच्या रेकॉर्डवर ११ टोळ्यांची नोंद होती. त्यामध्ये प्रामुख्याने बंडू आंदेकर, बाबा बोडके, गजा मारणे, उमेश चव्हाण, नीलेश घायवळ, गणेश मारणे, संदीप-शरद मोहोळ, बंटी पवार, बापू नायर, अन्वर नव्वा आणि वसीम खडा यांच्या टोळ्या होत्या. या काळात पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली. त्यामध्ये मोहोळ टोळीचा म्होरक्या संदीप मोहोळचा खून झाला. त्यानंतर विशीतील शरद मोहोळने मोहोळ टोळीची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर अन्वर नव्वा, वसीम खडा आणि शरद मोहोळचा खून झाला. त्यामुळे सद्य परिस्थितीत आंदेकर, गजा मारणे, गणेश मारणे, घायवळ, पवार आणि नायर या टोळ्या सक्रिय आहेत.
कोथरूड, वारज्यात सर्वाधिक टोळ्या
शहरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी सर्वाधिक आठ गुन्हेगारी टोळ्या कोथरूड आणि वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय आहेत. गेल्या दशकात बहुतांश टोळीयुद्धाचा भडका याच भागात उडाल्याचे दिसून येते. त्यापाठोपाठ पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन टोळ्या सक्रिय आहेत.
गुन्हेगारी टोळ्यांचा आढावा
एकूण ३२ टोळ्या आहेत. ११ जुन्या गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यात ४१५ सदस्य आहेत. नव्याने सक्रिय टोळ्या २१ आहेत. त्यात २४२ सदस्य आहेत. १३ सदस्य १८ ते २९ वयोगटातील आहेत. ९ सदस्य ३० ते ४० वयोगटातील आहेत. सात ४०च्या पुढील आहेत.