पुणे : सशस्त्र मारामाऱ्या व लुटमारीच्या तब्बल १२ गुन्ह्यांत वाँटेड असलेल्या सराईत गुंडाला पोलिसांनी गुरुवारी (दि. ३१) अटक केली. त्याच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पापासिंग दयालसिंग दुधानी (वय ५०, रा. हडपसर) हे या सराईत घरफोड्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लूटमारीचे व सशस्त्र मारामाऱ्यांचे १२ गुन्हे दाखल आहेत. तो गेले अनेक वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता.
तो बी.टी. कवडेनगर परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हडपसरमधील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग निश्चित झाला. तो पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सांगली येथील गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. पुढील तपासासाठी त्याला हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.