पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी (दि. १५) दिले आहेत. बहिरट हे सध्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या दंगल नियंत्रण पथकामध्ये नियुक्तीस आहेत.
त्यापूर्वी ते गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक होते. फसवणुकीच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी त्यांच्या सांगण्यावरून सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार मे २०२४ मध्ये करण्यात आली होती. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकताच गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवून पोलीस निरीक्षक बहिरट आणि क्षीरसागर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.