पुणे : पुण्यातील वारजे परिसरात भांडण सोडवल्याच्या रागातून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. भांडण सोडवल्याचा राग मनात धरून सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांनी एकमेकांना धारदार हत्याराने, विटांनी मारहाण केली. तसेच त्याठिकाणी पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली होती. हा प्रकार २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वारजे भागातील अचानक चौक आणि शिवाजी चौकात घडला होता. याबाबत दोन्ही टोळी विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
याप्रकरणी अचानक चौकातील टोळीचे अमरजित मुन्ना सिंग (वय-२३), रोहन अनिल चव्हाण (वय-३५ दोघे रा. अचानक चौक, रामनगर, वारजे) यांना चार तासात अटक केली. तर शिवाजी चौकातील टोळीमधील धनंजय उर्फ धनाजी नागनाथ सुर्यवंशी (वय-२९ रा. गणेशपुरी सोसायटी, रामनगर), हेमंत उर्फ विकी धर्मा काळे (वय-२६), युवराज धर्मा काळे (वय-२४), आकाश उर्फ अवधूत महेश यादव (वय-२९), कुंदन उर्फ सोन्या शिवाजी गायकवाड (वय-२६), संजय उर्फ बाबू विकास चव्हाण (वय-२० सर्व रा. शिवाजी चौक, रामनगर) यांना अटक केली असून त्यांच्या ३ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
याबबत अधिक माहिती अशी की, पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाली होती. यात रामनगर शिवाजी चौकातील टोळीचा आकाश रविंद्र दिवेकर (वय-२८) हा जखमी झाला होता. याचा बदला घेण्यासाठी शिवाजी चौकातील टोळीने रामनगर अचानक चौकातील टोळीचा सागर दिलीप कांबळे याला जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. घटनेनंतर आरोपी पळून गेले होते. दोन्ही टोळी विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे व पोलीस उपनिरीक्षक अनिता दुगांवकर करीत आहेत.