Crime पुणे : निगडी येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम शिक्षकाला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने १५ वर्ष सक्त मजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी (ता.२६) ठोठावली. हे आदेश न्यायाधीश के के जहागिरदार यांनी दिले.
गोपाळ किसनराव चव्हाण (वय-३३ रा. दत्त हौसिंग सोसायटी मोरे वस्ती, चिखली पुणे) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. हा प्रकार हा डिसेंबर २०१७ ते मे २०१८ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार..!
आरोपी चव्हाण याची निगडी परिसरात भागीदारीने खासगी क्लास आहे. तर पिडीत डॉ. डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये शिकत होती. तिने चव्हाण यांच्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. याचदरम्यान, आरोपी चव्हाण याने पिडीत विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखविले. त्या मुलीला निगडी येथील एका लॉजवर नेवून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी चव्हाण याला अटक केली होती.
या गुन्ह्याचा खटला हा शिवाजीनगर सेशन कोर्टात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. सुचित्रा नरोटे यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गोपाळ चव्हाण यास १५ वर्ष सक्त मजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील अॅड सुचित्रा नरोटे यांना पिंपरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख, सहाय्यक फौजदार अशोक परदेशी, पोलीस नाईक बालाजी भोसले यांची मदत मिळाली.