पुणे : पुण्यातील कात्रजच्या संतोष नगर भागात दोन गटात क्रिकेट खेळण्यावरून सुरु झालेले भांडण थेट गोळीबार करण्यापर्यंत पोहचल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. परंतु, दोन गटातील तरुणांची पळापळ सुरु झाल्यानंतर अडखळून पडल्याने काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना बुधवारी २० मार्चला संध्याकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान घडली.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रजच्या संतोषनगर भागात मंगळवारी क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोन गटात भांडणे झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारी हे दोन्ही गट एकमेकांना जाब विचारण्यासाठी समोरासमोर आले. तेव्हा त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. संध्याकाळी पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी एका गटातील तरुणाने पिस्तूल काढत थेट विरुद्ध बाजूच्या गटाच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी कोणालाही लागली नाही. त्यानंतर मात्र सर्वांची एकच पळापळ सुरु झाली. दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत सर्वजण पसार झाले होते. काही जणांच्या गाड्यांचे नंबर पोलिसांना मिळाले आहेत. त्यावरून शोध मोहीम सुरू करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले.