पुणे : पुण्यातील दांडेकर पूल परिसारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा मुलावर दहा ते बारा जणाच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. तसेच त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांना मारहाण केली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या टोळक्यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मयूर राम पालखे ( वय.२५, रा. दांडेकर पुल) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार धर्मादास कदम, चंद्रकांत कदम, निलेश कदम, अनिल लोंढे आणि साथीदारांच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयूर पालखे हा पुणे महापालिकेत कामाला आहे. त्याचे वडील राम पालखे सामाजिक कार्यकर्ते असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. मयूर बुधवारी रात्री घरी निघाला होता. त्यावेळी आरोपीचा नातेवाईक असलेल्या एकाने त्याला धक्का दिला. मयूरने जाब विचारला. त्यानंतर आरोपी धर्मादास कदम आणि नातेवाईक एकत्र आले. त्यांनी मयूर यांना कोयता मारला आणि लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. पुढील तपास पर्वती पोलीस करत आहेत.