पुणे : पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पालिकेचे माजी आरोग्य अधिकारी सतीश बाबुराव कोळुसरे (वय ४२, रा. पिंपळे गुरव, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे.
२०२१ मध्ये कोविड काळात वारजे येथील कै. अरविंद बारटक्के रुग्णालयात ८० ते ९० लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, डॉक्टर तारडे, डॉ. गार्डी आणि डॉ. भारती यांनी आपापसात संगणमत करून कोविड काळामध्ये कै. अरविंद बारटक्के हॉस्पिटलमध्ये कोविड तपासणीसाठी लागणारे साहित्य पुरविण्यात आले होते. यामध्ये टेस्टिंग किट, सॅनिटायझर, औषधे यांचा समावेश होता. या सर्वांनी स्वतःच्या हितासाठी आणि स्वार्थासाठी अन्यसाथीदारांना हाताशी धरून सरकारी कागदपत्रांमध्ये अनेक फेरफार केलं असल्याचं म्हटलं आहे.
तसेच खोटी कागदपत्रे तयार करून खरी असल्याची दाखवली. ही कागदपत्रे महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेला सादर करून पैसे कमावण्याच्या हेतूने कोविड टेस्ट तपासणीसाठी येणाऱ्या लोकांच्या नोंदवहीमध्ये खोट्या नोंदी केल्या. नागरिकांसाठी आलेल्या टेस्टिंग किड्स वापरल्या असल्याचे भासविण्यात आले.
त्या टेस्टिंग किट प्रायव्हेट लॅब आणि खाजगी व्यक्तींना विकून त्यामधून जवळपास ८० ते ९० लाख रुपयांची अफरातफर केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जैतापूरकर करत आहेत.