पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात कार चालकाला धमकावून बंगल्यात डांबून ठेवल्याप्रकरणी आरोपी सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी अटी शर्तीवर जामीन मंजूर केला. याबाबत कार चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय-४२) यांनी फिर्याद दिली आहे.
आठवड्यातून दोन वेळा पोलिस ठाण्यात हजेरी लावणे, जिल्ह्याची हद्द सोडून बाहेर जाऊ नये, पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये या अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, सुरेंद्रकुमार अग्रवाल कारागृहाबाहेर येणार असला तरी रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल याचा मुक्काम येरवडा कारागृहामध्येच असणार आहे.
अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाचे अपहरण करून बंगल्यात डांबून ठेवत त्याचा मोबाइल फोन काढून घेतला. तसेच त्याला धमकावल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अग्रवाल (वय-७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय-५०, दोघे रा. वडगाव शेरी) यांना अटक करण्यात आली होती.
या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस. बारी यांच्या न्यायालयात हा अर्ज करण्यात आला होता. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील योगेश कदम आणि बचाव पक्षातर्फे अँड प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.