पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील 18 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी आहे, असा अर्ज गुन्हे शाखेकडून न्यायालयात दाखल करण्यात आला. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ पोलिसांना दिली आहे.
या प्रकरणातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. गंभीर गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत 90 दिवसांची आहे. मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्याची मुदत 90 दिवसांपर्यंत वाढविता येते, असे सरकारी वकील विलास पटारे यांनी युक्तिवादात सांगितले.
वनराज आंदेकर खून प्रकरणचाा सखोल तपास करत असल्याने आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी. आरोपींच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात येत आहे, तसेच संघटित गुन्हेगारीतून मिळवलेल्या संपत्ती, मालमत्तेचा शोध घेण्यात येत आहे. खून प्रकरणातील सीसीटीव्ही चित्रीकरण, आरोपींचे मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून, न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप अहवाल मिळालेला नाही. आरोपींची येरवडा कारागृहात ओळख परेड घेण्यात येणार आहे. साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्याचे काम सुरू आहे. सखोल तपासासाठी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असे गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे.
दरम्यान, वनराज आंदेकर यांचा खून हा कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून (दि. 01 सप्टेंबर) रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करुन करण्यात आला आहे. आंदेकर यांची बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी काही कारणावरुन वाद झाले होते. त्या कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात 22 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन अल्पवयीन यांचा देखील समावेश आहे. आंदेकर खून प्रकरणाचे मुख्य सुत्रधार सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते, प्रकाश कोमकर, गणेश कोमकर यांच्यासह साथीदार येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.