युनूस तांबोळी
शिरूर : दुपारची वेळ होती… शेताला पाणि देत काम सुरू होते. अचानक मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला.काही काळ सुचत नव्हते. तेवढ्यात शेजारीच काम करत असणारा भाऊ धावून आला. त्याने कोणताही विलंब न लावता हातातील काठी घेऊन मदतीला धावला. बिबट्याने देखील त्याच्याकडे मोर्चा वळविला.
यात आम्ही दोघेही जखमी झालो. मात्र, या संकटात दोघांनीही धाडस दाखवत बिबट्यावर हल्ला चढविला. एकजूटीने हल्ला केल्यावर मात्र बिबट्याला माघार घ्यावी लागली. त्यानंतर त्याने मक्याच्या पिकात धुम ठोकली. मंगळवार ( ता. १० ) शिरूर तालुक्याच्या आमदाबात येथे ही घटना घडल्याचे थरथरत्या शब्दात जखमी असलेल्या तरूणांनी वनविभागासमोर घटना मांडली.
आमदाबाद ( ता. शिरूर ) येथे शेतात काम करत असणारे विकास रतन जाधव ( वय ३५ ) व वैभव मोहन जाधव हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले. त्यांना शिरूर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही बिबट्याच्या हल्ल्याची व्यथा मांडली.
या हल्ल्यात बिबट्याने प्रथम वैभववर मागच्या बाजूने हल्ला केला. बिबट्या त्याची मान पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच तेथे काम करत असणाऱ्या विकासने तेथील खोऱ्याच्या दांडक्याने बिबट्याला मारले. त्यामुळे बिबट्याने वैभवला सोडून विकास कडे मोर्चा वळविला. जीव वाचविण्यासाठी पळताना शेतातील ढेकळात पाय अडकून पडलेल्या विकास वर बिबट्याने मागिल बाजूने झेप घेतली.
त्याला पंजात पकडून ओढत असतानाच जखमी अवस्थेतील वैभव याने हिंमतीने पुन्हा उठून दांडक्याने बिबट्याला धोपटले. पाठीवर चांगलेच घाव बसल्याने बिबट्याने तेथून मक्याच्या पिकात धूम ठोकल्याचे या दोन्ही तरूणांनी सांगितले.
दरम्यान, शिरूर तालुक्याच्या बेट भागात बिबट्याचा असणारा धुमाकूळ व पाळीव प्राण्याबरोबर मनुष्यावर होणारे वारंवार हल्ले या मुळे या परिसरात घबराहट पसरली आहे.या हल्ल्यात हे दोन्ही तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांना अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदार राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर म्हणाले कि, ऊसाचे वाढलेले क्षेत्र त्यातून या परीसरात बिबट्यांची वाढलेली संख्या या मुळे बिबट्यांचा मानवी वस्ती वर होणारे हल्ले याकडे वनविभाने दुर्लक्ष करून चालणार नाही.
दिवसा मनुष्यावर होणाऱ्या हल्ल्यामुळे शेती व्यवसाय कसा करावयाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. तत्काळ काही तरी उपाययोजना करून बिबट्यांवर नियंत्रण वनविभागाने आणावे. तरूणांना मदत करावी. अन्यथा वनविभाागावर मोर्चा काढण्यात येईल.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे म्हणाले कि, शेतात काम करत असताना तरूणांवर बिबट्याचा हल्ला ही भयावह गोष्ट आहे. धाडसी तरूणांनी बिबट्याचा हल्ला परतविला असला तरी देखील शेतात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षीततेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा.