नारायणगाव : वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीत हिंभा डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यामध्ये उडी मारून एका जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यातील एकाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसरा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. तथापि कालव्यात पाणी जास्त असल्याने व पाण्याला अधिकचा वेग असल्यामुळे तसेच अंधार पडल्यामुळे दुसरा मृतदेह शोधण्यासाठी व्यत्यय येत आहेत.
त्यामुळे डिभा कालव्याचे पाणी कमी करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांच्याकडे केली आहे. चिराग चंद्रशेखर शेळके (वय-२८) व त्यांची पत्नी पल्लवी चिराग शेळके (वय-२५) अशी आत्महत्या केलेल्या जोडप्याची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वारुळवाडी येथे राहत असलेले चिराग शेळके व त्यांची पत्नी पल्लवी शेळके या जोडप्याने बुधवारी (दि. १) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वारुळवाडी-ठाकरवाडीच्या हद्दीत डिभा डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती वारुळवाडीचे पोलिस पाटील सुशांत भुजबळ यांनी दिली.
ते म्हणाले, हे जोडपे स्कूटर गाडीवरून कालव्यावर आल्याचे तेथे फिरायला येणाऱ्या लोकांनी पाहिले, त्यांनी स्कूटर कालव्याच्या कडेला लावून या जोडप्याने पाण्यात उडी मारण्याचे पाहिल्याचे सरपंच राजू मेहेर यांना सांगितले. शेळके कुटुंब हे मूळचे ओझर येथील असून, चिराग व पल्लवी यांचे लग्र आठ महिन्यांपूर्वी झाले आहे. ते पुणे येथे नोकरी करीत होते. काही कामानिमित्त ते गावाला आले होते. त्यांनी आत्महत्या करण्यामागील कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिस पाटील भुजबळ यांनी सांगितले.