पुणे : लग्न हा हिंदु संस्कृतीतील महत्त्वाचा असा एक शुभ कार्य. यात दोन जीवांबरोबरच दोन कुटुंब जोडली जातात. एका नव्या नात्याची सुरुवात होते. त्यात लग्नकार्य म्हटलं की धावपळ पळापळ ही आलीच. लग्न कार्यातील याच गोष्टी आठवणीत राहतात. पुण्यातील श्रवण शिंदे व श्रद्धा पाटील यांच्या लग्नासाठी जर्मनीच्या म्युनिच शहरात वास्तव्यास असलेले मुलगा लुकास स्टांग व मुलगी टेरेसा कोर्स हे दोघेजण आले होते.
हिंदु धर्म पद्धतीने श्रवण शिंदे यांचे लग्न सुरु होते. या लग्नातील हिंदू धार्मिक परंपरा, लग्नामध्ये पै-पाहुण्यांचा उत्साहाने असलेला सहभाग, हळद लावणे या विधी सुरु होत्या. त्यावेळी त्यांनाही हिंदू पद्धतीने लग्न करण्याचा मोह आवरला नाही. हे सर्व विधी पाहून लुकास व टेरेसा यांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हिंदू परंपरेप्रमाणे अशोक भटजी यांच्या साक्षीने विवाहसोहळा पार पडला.
पुणे शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील रोहन गरिमा सोसायटीतील रहिवासी संजय शिंदे यांचा मोठा मुलगा श्रवण हा जर्मनीत एका खाजगी कंपनीत सात वर्षापासून नोकरी करतो. श्रवण व श्रद्धा यांचे लग्न निशीगंधा जह महल, पिंपळोली (ता. मुळशी) या ठिकाणी 21 एप्रिल रोजी झाले आहे.
श्रवण जर्मनीत राहत असल्याने जर्मनीतील त्याचे मित्र, मैत्रीणी लग्नापूर्वीच तीन चार दिवस पुण्यात त्याच्या घरी आले होते. यावेळी लग्नातील प्रत्येक कार्यात म्हणजे मेंहदी काढणे, बांगड्या भरणे, साडी नेसणे, फेटा बांधणे, कपड्यांची खरेदी करणे अशा सर्व कार्यात विदेशी पाहुणे उत्साहाने सहभागी घेतला होता. प्रत्येकवेळी कार्यक्रमातील धार्मिक विधीचे महत्त्व जाणून घेत होते. या पाहुण्यांमध्ये मुलगा लुकास स्टांग व त्याची मैत्रीण टेरेसा कोर्स हे देखील सहभागी झाले होते. लुकास हा जर्मनीत सरकारी नोकरी करतो तर टेरेसा ही एका महामंडळात नोकरी करते.
पुण्यात श्रवण शिंदे या मित्राच्या लग्नासाठी आल्यानंतर शनिवारवाडा, पेठ परिसर, सारसबाग आदी भागात लुकास आणि टेरेसा फिरुन या गोष्टीचा आनंद घेतला. तसेच लक्ष्मी रस्त्यावरुन भारतीय पारंपरिक वस्त्र खरेदी केले. पुण्यातील प्रसिद्धी प्रेक्षणिय स्थळे त्यांना खूप आवडल्याचे सांगितले. लग्नमंडप, विधी, भटजी, होम, रांगोळी, फुलांच्या माळांनी सजवलेला परिसर पाहून लुकास व टेरेसा यांना लग्न करण्याचा मोह आवरता आला नाही. त्या दोघांनी श्रवण आणि श्रद्घाच्या लग्नकार्यात हिंदू धर्म पद्घतीने स्वत:चेही लग्न पार पाडले.
यावेळी श्रवणचे वडिल संजय शिंदे म्हणाले, माझा मुलगा श्रवण व श्रद्धाच्या लग्न हे कायम आठवणीत राहणारे आहे. श्रवणचे अनेक मित्र हे कॅनडा, जर्मनी, ब्राझील येथून आले होते. त्यामध्ये जर्मनीचे टेरेसा व लुकास हे मित्र-मैत्रीण सुद्धा आले होते. त्यांना आपला हिंदु धर्म पद्धतीचा विवाह सोहळा खूप आवडला. त्यांनी तेथेच हिंदू पद्घतीने लग्न करुन घेण्याबद्दल विचार बोलून दाखवला व आम्ही लगेच त्या गोष्टीला होकार दिला. थोड्याच वेळात विवाहसोहळ्यांची तयारी केली. विधी मंडपात यथा योग्य हिंदू पद्धतीने लग्न लावून दिले. यांचा विवाहसोहळा हा आमच्या मुलाच्या लग्नासोबत झाल्यामुळे तो अविस्मरनीय ठरला आहे.