इंदापूर : इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमार्फत सायबर क्राईम आटोक्यात आणण्यासाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधींच्या मार्फत या सायबर क्राईमविषयी जनजागृती निर्माण करून ही माहिती विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम येत्या फेब्रुवारी २०२४ पासून केले जाणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे बोलताना म्हणाले की, आज-कालच्या तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु जेवढे गुन्हे घडले आहेत, त्यापैकी दोन ते तीन टक्क्यांपर्यंत गुन्हे दाखल होतात. सायबर गुन्हेविषयी असणाऱ्या अज्ञानामुळे किंवा भीतीमुळे बरेच नागरिक गुन्हे दाखल करण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये काम करणाऱ्या टेक्निकल व्यक्तींना हे काम करण्यासाठी योग्य तेवढी माहिती उपलब्ध होत नाही. या कार्यक्रमांतर्गत सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करण्यात येईल.
पुढे ते म्हणाले की, सामान्यतः लोकांना फक्त आर्थिक फसवणूक हाच सायबर क्राईम माहीत असतो. परंतु वेगवेगळ्या समाज माध्यमातून अफवा पसरविणे किंवा वेगवेगळ्या समाज माध्यमातील उपलब्ध छायाचित्राचा किंवा व्यक्तिगत माहितीचा दुरुपयोग करून एखाद्या व्यक्तीचा चरित्र हनन करणे किंवा इतर कोणतीही वाईट माहिती पसरवण्याचे प्रकार यामध्ये होत असतात. परंतु सायबर सिक्युरिटीमधील माहिती नसल्यामुळे याविषयी गुन्हे दाखल करण्यास सामान्य व्यक्ती धजावत नाही. सर्वसामान्यांमध्ये सायबर सिक्युरिटी ही गोष्ट दुर्लक्षितच राहिलेले आहे. हा सर्व माहितीचा खजिना या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध करून देऊन त्या माध्यमातून हे गुन्हे उकलण्यात व आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
यामध्ये विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकलचा स्टाफ व विद्यार्थी हे सहभागी होऊन काम करणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक संतोष देवकाते व प्राध्यापक संजय पाटील हे करणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेची संकल्पना प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांची आहे.
यावेळी प्रा. चिकणे, प्रा. देवकाते, प्रा. जगताप, प्रा. गोरे, प्रा. माने, प्रा. देवकाते सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.