-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : तांदळी (ता. शिरुर) येथील शेतकऱ्याने शेतात पिकवलेला कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांदळी (ता. शिरुर) येथील शरद गदादे यांनी त्यांच्या शेतात कापसाचे पिक घेतले आहे. गदादे हे दिवसभर शेतातील काम आटोपून घरी आले होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास शरद गदादे हे शेतातील कापूस पाहण्यासाठी गेलेले असताना शेतातील तब्बल 15 गुंठे क्षेत्रातील कापूस चोरीला गेल्याचे दिसून आले.
याबाबत शरद मच्छिंद्र गदादे (वय 35 वर्षे रा. तांदळी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक शिंदे हे करत आहे.