लोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) येथील विकासकामांमध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी सुमारे ४ लाख ७२ हजार रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या आशयाची तक्रारदेखील ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यामार्फत पुणे जिल्हा परिषदेकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
वडकी ग्रामपंचायत हद्दीतील १४ विविध विकासकामांची देयके ठेकेदार शुभम तुकाराम लडकत यांच्या नावे काढली आहेत. ही कामे केलीच नसल्याची सदस्यांची आणि ग्रामस्थांची तक्रार आहे. ठेकेदार देखील ही कामे मी केलीच नसून माझ्या नावे बोगस बिले काढल्याचे म्हणत आहेत. तसेच सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी पैसे काढून घेतल्याचे शुभम लडकत यांनी लेखी स्वरुपात दिले आहे.
वडकी गावातील नळपाणी पुरवठ्याच्या कामांमध्ये ४ लाख ७२ हजार ८३२ रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे व शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख भानुदास परशुराम मोडक यांच्याकडे दिल्या होत्या. त्यानंतर विजय शिवतारे व भानुदास मोडक यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे केली होती. या तक्रारीची सीईओ रमेश चव्हाण यांनी तातडीने दखल घेतली असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वेल्हे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंकज शेळके व मुळशी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एम. पी. चव्हाण यांची नेमणूक केली आहे.
दरम्यान, तक्रारदार यांच्या अर्जातील सर्व मुद्यांबाबत अर्जदारांचे समक्ष जबाब घेऊन चौकशी करणे. तसेच स्वयं स्पष्ट अभिप्रायासह मुद्देनिहाय चौकशी करून १५ दिवसांच्या आत अहवाल या कार्यालयाकडे सादर करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिले आहेत.