पुणे: करोनाचा नवीन उपप्रकार जेएन १ या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यावरून टास्क फोर्सकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सरसकट रुग्णांना अँटिबायोटिक्स औषधे देण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य करोना टास्क फोर्सने सांगितले आहे.
राज्यात बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होत आहे. करोना विषाणूचा नवीन उपप्रकार ‘जेएन १’ विषाणूचा संसर्ग वाढत आहे. मात्र, सरसकट सर्व रुग्णांना’अँटिबायोटिक्स’ औषधे देण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य करोना टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे. सहव्याधी आणि पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या रुग्णांनाच अँटिबायोटिक्स औषधे द्यावीत, अशा सूचनाही टास्क फोर्सने राज्यातील सर्व डॉक्टरांना दिल्या आहे.
टास्क फोर्सच्या सूचना
– ताप, सर्दी, खोकला ही प्राथमिक लक्षणे असू शकतात.
– सहव्याधी नसलेल्या रुग्णांना अँटिव्हायरल औषधे देऊ नये.
– सर्व रुग्णांना अँटिबायोटिक्स देऊ नये.
– सर्व रुग्णांना ‘एचआरसीटी स्कॅन’ करण्याची गरज नाही.
– ‘सारी’च्या रुग्णांना ‘एचआरसीटी स्कॅन’ करता येईल मात्र, वारंवार करू नये.
– सर्व रुग्णांना ‘स्टेरॉइड’ देऊ नये.
– डिस्चार्ज देताना ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करण्याची आवश्यकता नाही.
– सहव्याधी असलेल्या रुग्णांना तीन दिवसांकरीता ‘रेमडेसिव्हिर’ द्यावे.
– ‘सारी’ आणि सहव्याधी रुग्णांना पाच दिवसांकरीता ‘रेमडेसिव्हिर’ द्यावे.
नव्याने आढळून येणाऱ्या करोना रुग्णांच्या सरसकट रक्ताच्या तपासण्या करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताच्या काही प्राथमिक तपासण्या कराव्यात अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.