पुणे : संततधार पावसामुळे पालेभाज्यांना फटका बसला आहे. लागवड कमी झाल्याने कोथिंबीर, मेथी, पालकासह सर्व पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. कोथिंबिरसह मेथी, पालक या पालेभाज्यांना उच्चांकी दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार कोथिंबिरेच्या एका जुडीला ६० ते ८० रुपये दर मिळाले आहेत. मेथीच्या एका जुडीला ५० रुपये दर मिळाले असून, पालकही तेजीत आहेत. रविवारी मार्केटयार्डात कोथिंबिरीची अवघी ७० हजार इतकी आवक झाली. मात्र, मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
पुणे विभागात संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला नाही. मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक बाजारात सध्या कमी प्रमाणावर होत आहेत. कोथिंबीर, मेथी, पालकासह सर्व पालेभाज्यांचे दर तेजीत असल्याची माहिती छत्रपती श्री शिवाजी मार्केट यार्डमधील पालेभाजी व्यापाऱ्यांनी दिली.
पुणे विभागातून सध्या पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. पावसामुळे पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण मोठे आहे. पालेभाज्या डागाळल्या आहेत. चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांना दर मिळाले आहेत. घाऊक बाजारात मेथी, कोथिंबीर, पालकासह सर्व पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. पालेभाज्यांची नवीन लागवड होण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे दर गणेशोत्सवापर्यंत तेजीत राहणार आहेत.