पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी, भावात वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबीर आणि मेथीचे दर ४० ते ५० रुपयांवर पोहोचले आहेत. तर, कांदापातीचे दर ४० रुपयांवर गेले आहेत. अन्य पालेभाज्यांचे दर ३० रुपये गड्डीवर गेले आहेत. पुढील पंधरा दिवस तरी पालेभाज्यांचे हेच दर कायम राहतील, अशी शक्यता पालेभाज्या विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कोथिंबीर, मेथी, कांदापात आवक कमी असल्याने भावात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्याही तेजीत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तरकारी विभागात रविवारी (दि. २३) कोथिंबिरीची सुमारे १ लाख २५ हजारी जुडी, तर मेथीची ५० हजार जुडींची आवक झाली होती.
घाऊक बाजारातील पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
कोथिंबीर: २५००-४०००, मेथी २५००-३५००, शेपू : ८००-१५००, कांदापात : १०००-२५००, चाकवत : ८००-१०००, करडई : ८००- १२००, पुदिना : १०००-१५००, अंबाडी ८००-१२००, मुळे : १५००-२०००, राजगिरा : ८००- १२००, चुका : १०००-१५००, चवळई ८००-१२००, पालक १५००-२५००.