भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील नामांकित रयत शिक्षण संस्थेच्या भिगवण विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉप्यांचा अक्षरश: सुळसुळाट झाला. पेपर सुटल्यानंतर कॉप्यांचे ढीग हे वर्गखोल्यांच्या खिडक्यांच्या बाहेर तसेच शाळेच्या मैदानात पडलेले पाहायला मिळाले.
दहावीचा इतिहास विषयाचा पेपर सुटल्यानंतर परीक्षा देणारे विद्यार्थी बिनदास्तपणे पेपर सुटल्यानंतर शाळेच्या आवारात कॉप्यांची कात्रणे आकाशात भिरकावत बाहेर येत आहे. तर काहीजण परीक्षा वर्गखोल्यांच्या बाहेर टाकत आहे. ही परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक कोणतीच कठोर भूमिका न घेता मुलांचे उज्ज्वल भविष्य घडावे म्हणून शिक्षकच मुलांच्या या कॉपी प्रकरणाला प्रोत्साहन देत आहेत का? असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
मागील दोन-तीन दिवसांपूर्वी ही या केंद्रावर भरारी पथकाने अचानक भेट दिल्यानंतर तीन विद्यार्थ्यांवर कॉपी केस झाल्याचा प्रकार घडला होता, अशी कुजबूज नागरिकांमध्ये चालू होती. हा प्रकार ताजा असतानाच आज परीक्षा केंद्राबाहेर इतिहास विषयाच्या पेपरची कॉपीची कात्रणे बाहेर पडलेली पाहून या विद्यार्थ्यांना केंद्रसंचालक व संबंधित शाळेतील शिक्षक हे मुलांच्या कॉपी प्रकरणाला प्रोत्साहन देत आहे की काय? अशी शंका उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही.