पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रेनकोटवरुन झालेल्या वादातून घरपोहोच खाद्यपदार्थ पोहोच करणाऱ्या तरुणावर मित्राने चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सिंहगड रस्ता परिसरात २६ ऑगस्ट रोजी घडली आहे. आदित्य श्रीकृष्ण वाघमारे (वय-२३, रा. कारी, ता. धारुर, जि. बीड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी सुरेश परमेश्वर भिलारे (वय-१८, रा. जाट नांदूर, ता. धारुर, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करून सिंहगड रास्ता पोलिसांनी अटक केली अहे. याबाबत सिद्धेश्वर मोरे (वय-२४, रा. वाल्हेकर चौक, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि सुरेश हे दोघेजण मित्र आहेत. दोघेजण एका पिझ्झा विक्री करणाऱ्या उपहारागृहामध्ये कामाला आहेत. हे दोघेजण मूळचे बीड जिल्ह्यातील एकाच तालुक्यातील जिवलग मित्र आहेत. घरपोहोच पिझ्झा तसेच वेगवेगळे जीवनावश्य साहित्य पोहोचविण्याचे काम दोघे करतात, तसेच रात्री ते खासगी कंपनीत काम करत आहेत.
रविवारी सकाळी दोघांमध्ये रेनकोटवरुन भांडण झाले होते. रेनकोट न दिल्यामुळे आरोपी सुरेश त्याच्यावर खूप चिडला होता. त्यानंतर रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोघे जण नऱ्हे परिसरातील झिल महाविद्यालयाजळ भेटले होते. तेव्हा पुन्हा त्याच्यात रेनकोटवरुन वाद झाला होता.
दरम्यान, सुरेशने त्याच्या जवळ असणाऱ्या चाकूने आदित्यवर वार केले. बरगडीवर चाकूने वार केल्यामुळे आदित्य गंभीर जखमी झाला आहे.गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव करत आहेत.