पुणे : देशभरात चर्चेत असणाऱ्या वादग्रस्त IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकरचे स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांसोबत देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत.
पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. महाडमधील एका हॉटेल मधून पूजा खेडकरच्या आईला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावण्याचा प्रकार भोवला..
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरवर पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं होतं. खेडकर कुटुंबाकडून कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलिस निघून गेले होते.
मनोरमा खेडकरने बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरसह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलिस यासंदर्भात मनोरमा खेडकरची चौकशी करण्यासाठी आले होते. पण त्यांच्या घरी कुणीही नसल्याने पोलिस परत गेले. त्यानंतर मनोरमा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर आली होती. आज तिला महाडमधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे.