पुणे: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम कक्ष (मीडिया सेल) हा ए-विंग, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२०- २९९९६०६५ असा आहे. या ठिकाणाहून माध्यमांना निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध करुन दिली जात आहे. समाज माध्यमांवरील निवडणूक विषयक आचारसंहिता भंग किंवा आक्षेपार्ह मजकुरावरही या कक्षामार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे.
माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समितीचे कामकाज जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून रुग्णालयासमोर, पुणे- ४११००१ येथून चालणार असून दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२१३०७ असा आहे. या ठिकाणी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणीत करण्यासंबंधीची कार्यवाही केली जाणार आहे. समितीमार्फत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.