पुणे : पुणे मनपामध्ये १० हजार ५०० कंत्राटी कामगार वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या कत्राटदारांमार्फत कार्यरत असून, त्यांचे अनेक प्रश्न मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे कामगारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय मजदूर संघातर्फे महापालिकेच्या आयुक्तांकडे कंत्राटी कामगारांचे गाऱ्हाणे मांडले. मात्र, अद्याप मागण्यांसंदर्भात कोणताही निर्णय घेतला गेला नाही. गेल्या वर्षी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी गेटवर आमरण उपोषण केले. त्या आंदोलनाची दखल घेऊन कामगार उपायुक्त कार्यालयाने पुणे महापालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांनां बोनस अधिनियम लागू होत असून, त्यांना तो बोनस दिला पाहिजे, असे पत्र महानगरपालिका आयुक्त, पुणे यांना दिले.
महानगरपालिका आयुक्तांनी मनपामधील सर्व कंत्राटदारांना कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत पत्र दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु, कोणत्याही कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांना बोनस दिला नाही. याबाबत अनेकदा तक्रार करूनही महापालिकेच्या प्रशासनाने या कंत्राटदारांवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे कामगारांची फसवणूक झाल्याची भावना कामगारांमध्ये पसरली आहे.