संतोष गायकवाड
वाघोली : बकोरी (ता. हवेली) येथील वैकफिल्ड कंपनीने सोडलेले रसायनयुक्त पाणी भूगर्भात पाझरत असल्याने व दुर्गंधीयुक्त पाणी प्रक्रिया न करता सोडण्यात येत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. नियमांचे उलंघन करणाऱ्या वैकफिल्ड कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी नवनाथ वारघडे यांनी अर्जाद्वारे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाकडे केली आहे.
बकोरी येथे अनेक वर्षांपासून वेकफिल्ड नावाने मशरूम उत्पादन करणारी कंपनी सुरु आहे. कंपनीच्या आवारात विविध ठिकाणी वाफे तयार करून भुस्सा, कोंबडी खत, युरिया व जिप्सम यासारखे रासायनिक पदार्थ वापरून मिश्रण केले जाते. या प्रक्रियमध्ये जिप्सम या रसायनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. रसायनयुक्त पाणी भूगर्भात पाझरत असल्याने भूगर्भातील जलसाठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे.
दरम्यान, दुर्गंधीयुक्त पाणी कंपनीजवळ असलेल्या तळ्यामध्ये सोडले जात आहे. स्थानिक शेतकरी नवनाथ वारघडे यांची कंपनीलगत शेती असून, त्यामध्ये विहिर आहे. रसायनयुक्त व दुर्गंधीयुक्त सांडपाणी लगतच्या विहिरीत पाझरत असल्याने विहिरीतील पाण्यावर शेवाळासारखा हिरवा थर साचला आहे. परिणामी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरता येत नसून, मासे देखील मृत झाले आहेत. याबाबत ग्रामपंचायत, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार लेखी तक्रार करून देखील अद्यापही कारवाई करण्यात येत नसल्याचे वारघडे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.
न्याय मिळेपर्यंत लढणार
गेले दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. पण अजून कारवाई करण्यात आली नाही. न्याय न मिळाल्यास कंपनी आणि प्रदूषण मंडळ अधिकारी यांच्याविरोधात हरित लवादाकडे न्यायाची मागणी करणार आहे. न्याय मिळेपर्यंत शेती आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी लढणार आहे.
– नवनाथ वारघडे, स्थानिक शेतकरी, बकोरी
योग्य ती कारवाई केली जाईल
या आठवड्यात वैकफिल्ड कंपनीला भेट देवून पाहणी केली जाईल. एमपीसी बोर्डाच्या नियमांचे कंपनीकडून उलंघन होत असल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
– रेखा टोगरे, फिल्ड ऑफिसर, एम.पी.सी.बी., पुणे