पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात ब्रेकफेल झालेल्या कंटेनर ट्रकने आठ वाहनांना उडविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी, तर सहा ते सात जण किरकोळ जखमी झालेले आहेत. रमेश शामराव पाटील आणि त्यांचा मुलगा राज रमेश पाटील (रा. वाकुर्डे ता. शिराळा, जि. सांगली), सजल गिरीराज शर्मा (रा. पुणे) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना आज रविवारी (दि. २२) दुपारच्या सुमारास खंबाटकी घाटातील धोकादायक वळणावर घडली. आठ गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा- पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील धोकादायक वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर चालकाने एक सारखे हॉर्न वाजवत गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीव्र उतार असल्यामुळे गाडीचा वेग वाढल्याने तब्बल सात वाहनांना जोरदार धडक दिली.
या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले, तर सहा ते सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. यामध्ये रिक्षासह सहा कार्सचा समावेश आहे. रिक्षासह सर्व गाड्यांचे मोठ नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. जखमींन तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.