यवत : हैदराबादवरून मुंबईकडे 25 हजार किलोचे गोमांस घेऊन जाणारा कंटेनर गोरक्षकांच्या मदतीने पकडला गेला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.18) ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गोमांस हैदराबाद कडून मुंबईकडे घेऊन जात होते. ही माहिती गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन यांना मिळाली. यावेळी त्यांनी मित्र प्रकाश खोले, प्रतिक कांचन यांच्या मदतीने सदर कंटेनर सोलापूर वरून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हैद्राबाद येथुन सोलापुर- टेंभुर्णी- भिगवण- रावणगाव- पुणे मार्गे मुंबई येथे गोमांस वाहतुक करून घेवुन जात होते.
यावेळी कंटेनर ट्रक क्र. एम.एच. 46 ए.आर. 0516 थांबवून कंटेनरची पाहणी केली असता कंटेनरमध्ये 28.8 टन वजनाची क्षमता असताना 29 टनापेक्षा अधिक वाहतूक करीत गोमांस वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत दौंड पोलीस स्टेशन यांना कळविण्यात आले. कंटेनर मध्ये सुमारे 40 लाख रु. किंमतीचे 25 हजार किलो वजनाचे गोमांस व 7 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 4 हजार किलो वजनाचे म्हशीचे मांस व कंटेनरसह एकूण 59 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत अक्षय कांचन यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
याबाबत कंटेनर चालक चंद्रकांत दत्तु साळुंखे ( रा. खांदा कॉलनी ता. पनवेल, जि. रायगड, मुळ रा. जळवा, ता. सांगोला , जि. सोलापूर ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, सहाय्यक फौजदार कुंभार, पोलिस हवालदार बंडगर, पोलिस हवालदार पांढरे, पोलीस हवालदार राऊत, पोलीस कॉन्स्टेबल कोठावळे यांनी केली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड हे करीत आहेत.