Constitution Day 2023 : पुणे : देश आज संविधान दिवस साजरा करत आहे. भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून देखील ओळखला जातो. भारतीय संसदेने १९४९ मध्ये या दिवशी अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला. २६ जानेवारी १९५० पासून संविधान देशात लागू झाले. १९ नोव्हेंबर, २०१५ रोजी केंद्रीय सामाजिक आणि सशक्तीकरण मंत्रालयाने २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. जाणून घेऊया संविधान दिनाचा इतिहास आणि महत्व…
जगभरातील संविधान बारकाईने वाचल्यानंतर, त्याचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता. त्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेसमोर मांडला. संविधानाचा स्वीकार करुन आज ७४ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘संविधान दिवस’ हा देशाचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देण्याचेही प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. भारतात आजच्या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भारताचे संविधान तयार करण्यासाठी एकूण २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला होता. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की, पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात आपल्या देशातील तरूणांमध्ये संविधानाची मूल्ये आणि तत्वे रूजवणे. आपल्या भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. आज आपण हा भारतीय संविधान दिन का साजरा केला जातो? आणि त्याचे महत्व काय? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
संविधान दिनाचे महत्त्व काय?
भारतीय राज्यघटनेत अनेक महत्वपूर्ण तत्त्वे आहेत, ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत, राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे इत्यादी ठरवण्यात आले आहेत.
संविधानाच्या निर्मितीत डॉ. आंबेडकर यांची भूमिका
आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही हा भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.
संविधानाबाबत जाणून घेऊया…
– भारताचे संविधान डिसेंबर १९४६ ते डिसेंबर १९४९ दरम्यान तयार करण्यात आले. हा अतिशय आव्हानात्मक काळ होता. कारण धार्मिक दंगल, जातीभेद आणि स्त्री-पुरुष असमानता देशाच्या सार्वभौमत्वाला धोक्यात टाकत होती.
– भारतीय राज्यघटना मूलभूत राजकीय तत्त्वे स्पष्ट करणारी चौकट आखून देते. सरकारी संस्थांची रचना, प्रक्रिया, अधिकार आणि कर्तव्ये निश्चित करते. तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार, निर्देशांची तत्त्वे आणि कर्तव्ये ठरवते.
– संविधान सभेने याचा मसुदा तयार केला होता. ३८९ सदस्यांच्या संविधान सभेला स्वतंत्र भारताचं संविधान बनवण्याचं ऐतिहासिक कार्य पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे, ११ महिने आणि १७ दिवस लागले. या दरम्यान १६५ दिवसांच्या अवधीची ११ अधिवेशने आयोजित करण्यात आली होती. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी २९ ऑगस्ट, १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ड्राफ्टिंग समितीची स्थापना केली होती.
– हा मसुदा ना छापील होता ना टाईप केलेला होता. हा मसुदा हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये चक्क हाताने लिहिण्यात आला होता.
– जेव्हा भारतीय संविधान अस्तित्त्वात आलं, तेव्हा देशात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
– आपल्या संविधानाला ‘Bag of borrowings’ असेही म्हटले जाते. कारण यामध्ये विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास करुन त्यांचा काही निवडक विचारांचा समावेश करण्यात आला आहे.