संतोष पवार / पळसदेव (पुणे) : खाजगी माध्यमिक अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या अनुषंगाने संचमान्यता करण्याचे काम शिक्षण विभागाकडून (Department of School Education) सुरू आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचा महत्त्वाचा पुरावा ग्राह्य धरून ही संचमान्यता करण्यात येत होती. मात्र आता शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यात शहरी भागांसह ग्रामीण भागातील शासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानीत, विनाअनुदानित, स्वंय अर्थसाहाय्य शाळांची एकूण संख्या ३ हजार ९७५ इतकी आहे. या सर्व शाळांमध्ये आठ लाख १३ हजार ४९६ विद्यार्थी शिक्षण घेतात. प्रत्येक तालुका व शहरातील गटसाधन केंद्रांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या मोजून बीईओंना अहवाल सादर केला आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करीत प्रत्यक्षात शाळेला भेट देऊन विद्यार्थी संख्या मोजून संचमान्यता तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
यापुर्वी शिक्षकांची संच मान्यता करताना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जायचा. ते शाळा व्यवस्थापनाकडून प्राप्त झाल्यानंतर शाळेत विद्यार्थी संख्येचा निश्चित आकडा मिळायचा. परंतु विस्तार अधिकाऱ्यांना शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या प्रत्यक्ष मोजायची आहे. हा सर्व पट विस्तार अधिकाऱ्यांना जीओ टॅगिंगच्या मदतीने बीईओंना सादर करावयाचा आहे.