पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय पक्षांच्या वतीने चर्चा, बैठका, मेळाव्यांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार पक्षाकडे उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करण्याच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील सर्व जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. जागा वाटपासंदर्भात पक्षांनी देखील चर्चा सुरू केल्या आहेत. त्यातच पुणे लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाने दावा सांगितल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान धंगेकर यांनी वरिष्ठ नेत्यांकडे याबाबतची इच्छा व्यक्त केली. दिल्लीत शुक्रवारी (ता. १२) लोकसभा समन्वयकांची बैठक पार पडली. यासाठी धंगेकर दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांनी काँग्रेस मुख्यालयात भेट घेऊन खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली. आता दिल्लीकरांची भेट झाल्याने धंगेकर लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागणार आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील लवकरच त्यासाठी पुण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
जागावाटपाबाबत पक्षांच्या चर्चांना सध्या ऊत आला आहे. अशातच पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षाने दावा सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.