पुणे: काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमदेवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. काँग्रेसने पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे पुणेकर कुणाला पसंती देणार, हे चार जून रोजी स्पष्ट होणार आहे.
आमदार रवींद्र धंगेकर हे 2023 मध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत विजयी झाले. माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठेतील जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक झाली होती. कसबा पेठ भाजपचा बालेकिल्ला जातो, तरीही रवींद्र धंगेकर यांनी कसबापेठ पोटनिवडणुकीत बाजी मारली.