पुणे: महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. परंतु , जुन्नरचे राजकारण कायम चर्चेत राहिले. आता विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील राजकारणाने वेग घेतला आहे. अशातच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर हे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर यांनी आज (दि. ९) शरद पवारांची भेट घेतली आहे. सत्यशील शेरकर हे जुन्नरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. शेरकर सध्या काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. परंतु, जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. त्यामुळे शेरकर हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. आता आमदार अतुल बेनके यांच्या विरोधात सत्यशील शेरकर यांचे आव्हान असणार आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार आतून बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेलो बोलताना बेनके म्हणाले होते की, मी जरी अजित पवार गटाकडून असलो, तरी माझे विचार मात्र शरद पवार साहेबांसारखे आहेत. या विचारांमुळे अतुल बेनके हे शरद पवार यांच्या कार्यक्रमांमध्ये देखील पाहायला मिळत होते. त्यामुळे अतुल बेनके यांचे नक्की चालले तरी काय? अशी चर्चा सुरू होती. सध्या ही चर्चा मागे पडली असून शरद पवारांनी सत्यशील शेरकर यांच्या रूपाने बेनके यांच्याविरोधात तगडा उमेदवार शोधल्याचे बोलले जात आहे.