पुणे : येथील JSPMकॉलेज जवळच्या जागेची बनावट कागदपत्रे तयार करणारे तसेच त्या कागदपत्राची फसवणूक केल्याप्रकरणी काँग्रेस नेता इम्रान (कट्टा) शेख यास आज मध्यरात्री वानवडी तपास पथकाकडून ताब्यात घेतले. यावेळी वानवडी पोलीस ठाण्याचे वपोनि संजय पतंगे, गुन्हे निरिक्षक करणकोट यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक संतोष सोनवणे व त्यांच्या पथकाने सदर कामगिरी केली आहे. फिर्यादी संघवी व परमार यांची जागा बळकावण्यासाठी बेकायदेशीर पत्र्याचे शेड बांधून राज गुलाब शेख, बक्षु भाई, इम्रान कट्टा व इतर यांनी कट रचून बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुरन. १६२/२०२४ भादंवि १२० ब, ३४, ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४५२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत होते. परंतु कोर्टाकडून जामीन फेटाळण्यात आल्याने आरोपी फरार झाले होते. स्वत:ला आर्थिक फायदा व्हावा त्यासाठी कट रचण्यात आला होता. त्या जागेचे बनावट कागदपत्र तयार केले. आणि जागा बळकावल्याप्रकरणी सराईत राज शेख व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हडपसर येथील JSPM कॉलेज जवळील 10 गुंठ्याचे बनावट कागदपत्र तयार केले. त्यानंतर तेथील जागा बळकावल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. राज गुलाब शेख हा सराईत भू माफिया आहे. त्याने अनेकांना जागेच्या व्यवहारातून गंडा घातल्याची माहिती समोर आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून राज शेख फरार आहे. याबाबत जागा मालक विना संघवी यांच्याकडून फिर्यादी विजय संघवी यांनी वानवडी पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती.
तसेच याबाबत अधिक माहिती अशी आहे की, संघवी यांनी सन २००५ मध्ये राजकुमार कोयाळीकर, चंद्रकांत घुले यांच्याकडून हडपसर सर्वे नं. ५९ हिस्सा नं. १/३/१, १/४/२, १/४/३, १/५/५, १/५/१ व इतर यातील २६.५ गुंठे जागा करारनामा केला होता. दुय्यम निबंधक कार्यालय-३ येथे दस्त क्रं. ६३५३/२००५ करून विना संघवी व पुष्पाबाई परमार यांच्या नावाने नोंदवून घेतली होती. यानंतर सन २०१३ ला सदर मिळकतीबाबत खरेदीखत करण्यात आला होता. खरेदीदस्त नोंदणी झाल्यानंतर फिर्यादी यांच्याकडून सदर जागेवर कंपाउंड करण्यात आले होते.
यानंतर सदर मिळकतीच्या १० गुंठ्यांवर काही लोकांनी बेकायदा ताबा घेत राहण्यास सुरुवात केले होते. यातील लोकांना फिर्यादी यांच्याकडून विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी सदर जागा राज गुलाब शेख, बक्षु भाई व इतर यांच्याकडून पैसे देऊन दस्तऐवज तयार करून घेतली असल्याचे समोर आले होते. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे करीत आहेत.