योगेश मारणे
न्हावरे : न्हावरे (ता. शिरूर) येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (दि. २०) दुपारी दोन वाजता पार पडली. सत्ताधारी व विरोधक दोन्ही बाजूने प्रश्नोत्तराच्या वेळेस गोंधळ झाल्याने ही सर्वसाधारण सभा गोंधळातच पार पडली. यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच दोन्ही बाजूने सभेच्या ठिकाणीच पुन्हा प्रतिसभा घेण्यात आल्या. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने तसेच विरोधकांच्या बाजूने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर एकमेकांविरोधात घोषणा दिल्या.
दरम्यान, कारखान्याचे माजी अध्यक्ष, तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी मध्यस्थी करून पुन्हा सभा सुरू करण्यासाठी उपस्थित सभासदांना विनंती केली. पुन्हा सभा सुरू झाल्यानंतर प्रस्ताविकामध्ये बोलताना कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांनी कारखान्याची वस्तुस्थिती मांडताना सहकारी साखर कारखानदारी कशी अडचणीत आहे हे सांगितले.
घोडगंगा कारखान्याचे कर्ज ‘एनपीए’ मध्ये नसताना सरकार बदलल्यामुळे कारखान्याचे कर्ज नाकारले गेले. त्यामुळे ‘एनसीडीसी’ चे कर्ज कारखान्याला मिळावे यासाठी कोर्टात केस सुरू असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांनी दिली. तसेच पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, लवकरच कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट भुजबळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. तसेच कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, रवी काळे, बाळासाहेब घाटगे, सुरेश पलांडे, महेश ढमढेरे, सुधीर फराटे, शरद गद्रे, तात्या शेलार यांनी प्रश्नोत्तराच्या वेळी सहभाग घेतला. याप्रसंगी मोठ्या संख्येने कारखान्याचे सभासद उपस्थित होते. दोन्ही बाजूने कारखाना कार्यस्थळावर प्रतीसभा संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगीताने सांगता झाली.