उरुळी कांचन (Uruli kanchan ): उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ”सोनार हनीट्रॅप” प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. खोटी बातमी प्रसिद्ध करून सोशल मिडीयावर बदनामी केल्याचा आरोप करीत एका सराफाने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका स्वयंघोषित पत्रकारावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश वाळेकर (पुर्ण नाव माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या स्वयंघोषित पत्रकाराचे नाव आहे. तर याप्रकरणी संतोष विठ्ठल बोकन (वय 41, रा. गडकरवस्ती प्रयागधाम रोड उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष बोकन हे उरुळी कांचन येथे सोनारकाम करतात. तर सुरेश वाळेकर हे पुणे टाईम्स लोकदर्पण या पेपरचे पत्रकार आहेत. वाळेकर यांनी हनीट्रॅप संदर्भात ‘महिलेलाच लुटणारा खरा गुन्हेगार उरुळी कांचन शहरातील निघाला रहीवासी’ या हेडलाईनखाली बातमी केली होती. या बातमीत संतोष बोकन यांनी एका महिलेस फसवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच त्या क्षणांचे विचित्र फोटो काढून त्यांना ब्लकमेल करत पैशांची मागणी केली, अशी बातमी वाळेकर यांनी प्रसिद्ध केली होती.
दरम्यान, वाळेकर यांनी याबाबत कोणतीही खात्री न करता संतोष बोकन यांच्या नावानीशी बातमी छापली. या बातमीमुळे त्यांची समाजात बदनामी झाली, असा आरोप करीत संतोष बोकन यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार वाळेकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 356(3) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले करत आहेत.