पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून ‘राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात’ या मथळ्याखाली जाहिरात केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत, असे छायाचित्र असलेली पत्रके वाटली. याप्रकरणी काँग्रेसने मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे.
माजी आमदार मोहन जोशी आणि काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी यांनी या तक्रारीबद्दल सांगितले आहे. ‘राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला, याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप काँग्रेसने केला.
दरम्यान, काँग्रेसचे चैतन्य पुरंदरे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मोहोळ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पुरंदरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.
देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरु आहे. यामुळे निवडणूक आयोग आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून बारकाईने लक्ष आहे.