राहुलकुमार अवचट / यवत : बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या स्व. लताबाई धावडे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दौंड तालुक्यातील कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात ७ डिसेंबर रोजी दुपारी शेतात काम करीत असताना लताबाई बबन धावडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पुणे जिल्ह्यात उसतोडणीचा हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणात बिबटे मानवी वस्तीत घुसून नागरिकांवर, शेतकऱ्यांवर हल्ला करीत आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या स्व. लता धावडे यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळण्याची आवश्यकता असून यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत संबंधितांना आदेश व्हावेत अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. याबाबत सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे आमदार राहुल कुल यांनी यावेळी सांगितले.