पुणे : पत्नीचा गळा आवळून खून करून तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. धनकवडी परिसरात ही घटना घडली आहे. स्वप्नील शिवराम मोरे (वय-३०, रा. घोरपडी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर अंजना उर्फ अंजली बापू खंडाळे उर्फ अंजली स्वप्नील मोरे (वय-२९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील आणि अंजली यांचा काही वर्षांपुर्वी विवाह झाला असून त्यांना दोन मुले आहेत. मात्र, स्वप्नील हा अंजली यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात सतत वाद होत असायचे. त्यामुळे ते दोघेही वेगवेगळे राहत होते. अंजली या धनकवडी येथील चव्हाणनगर येथे मुलांसोबत राहत होत्या. तर, स्वप्नील घोरपडी पेठ येथे आईसोबत राहत होता. तो अधून-मधून अंजली यांच्याकडे जात जायचा.
दरम्यान, शनिवारी अंजली या गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्या. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालय दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. महिलेच्या मृत्यू बाबत पोलिसांना संशय आल्याने चौकशी सुरु केली.
तेव्हा पोलिसांना पतीने गळा दाबून खून केला आणि त्यानंतर फासावर लटकवून निघून गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी स्वप्नीलला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खूनाची कबूली दिली. ही कारवाई उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त नंदिनी वाग्यांनी, पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, उपनिरीक्षक युवराज पोठरे, रेश्मा साळुंखे व त्यांच्या पथकाने केली.