पुणे : कॉलेज तरुणीचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केले. त्याचप्रमाणे वेळोवेळी तिचा पाठलाग करुन लग्नासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी रिक्षाचालकावर हडपसर पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी ते २३ डिसेंबर २०२३ या दरम्यान तरुणीच्या घराच्या व कॉलेजच्या परिसरात तसेच ग्लायडिंग सेंटर व कॅम्प येथे हा प्रकार घडला.
याबाबत हडपसर परिसरातील काळेपडळ येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने सोमवारी (ता. २५) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन महेश पाटील (वय २७, रा. खंडोबा माळ, भोसरी) याच्यावर पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश पाटील रिक्षाचालक आहे. त्याने फिर्यादी तरुणीचा तिच्या राहत्या घराच्या परिसरात तसेच ग्लायडिंग सेंटर येथे पाठलाग केला. फिर्यादी कॉलेजला गेल्या असता पाटील याने कॉलेज परिसरात तरुणीचा पाठलाग केला. तसेच तरुणीचा हात पकडून त्याच्यासोबत लग्न करण्याची जबरदस्ती केली. त्यावेळी तरुणीने हात झटकून त्याच्यासोबत लग्नाला नकार दिला. यामुळे चिडलेल्या आरोपीने तरुणीला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कामठे करीत आहेत.